ई'कारनामा'
www.ecarnama.in
हे संकेतस्थळ आपण सेवाभावी वृत्तीने सुरू करीत आहोत. यावर वाहन उद्योगाशी (कार, मोटारसायकल व व्यवसायिक वहाने) संबंधित माहिती मराठी माणसाला त्याचाच भाषेत समजून घेता यावी व गाडीची योग्य निवड करताना या माहितीचा उपयोग व्हावा हा आमचा प्रयत्न असेल.
तुम्हाला, नवी कार घ्यायची आहे. साधारण बजेट ठरलेलं आहे. त्या बजेटमधे मिळणाऱ्या पाच सहा कार्स तुम्हाला माहीत आहेत. त्यातली एखादी कार तुम्हाला मनापासून आवडते. पण का आवडते?-या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येत नाही....आवडते, बस्स!
पण इतक्या महागाची वस्तू अशी किरकोळीत कशी घेऊन टाकायची? म्हणून तुम्ही चिक्कार मार्केट रिसर्च करता! या शोधत ईकारनामा आपल्याला मदत करेल.
खर तर हीच गाडी का? याचं उत्तर तुम्हाला देता येत नाही. मग “माझं मन म्हणत होतं म्हणून” हे उत्तर आपण देतो. पण आपण एखादा निर्णय खूप लॉजिकली आणि काथ्याकूट करून घेतो की मन म्हणतं म्हणून?
या विषयावरचा सायमन सिनेक या माणसाचा एक व्हिडीओ युट्यूबवर पहाण्यात आला, आणि तो मनोमन पटला. तो म्हणतो की माणसाच्या मेंदुचा जर एक सेक्शन घेतला तर तो एकात एक असलेल्या तीन वर्तुळांसारखा दिसतो. सगळ्यात बाहेरचे जे वर्तूळ आहे ते म्हणजे निओकॉर्टेक्स. त्याला ज्या गोष्टी कळतात त्या म्हणजे भाषा, आकडेमोड, लॉजिक वगैरे वगैरे. आणि आतलं जे छोटं वर्तुळ आहे, तो म्हणजे आपला लिम्बिक ब्रेन. हा आहे आपल्या मेंदु मधला निर्णय घेणारा भाग! आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिम्बिक ब्रेनला भाषा कळत नाही. त्याला कळतात त्या फक्त “भावना”.
एखादी कार विकणारी कम्पनी जेव्हा तुम्हाला सांगते की “आम्ही अशी कार बनवतो जिला मेंटेनन्स कमी आहे, तिचं मायलेज चांगलं आहे, म्हणून तुम्ही ती घ्या", तेंव्हा ती तुम्हाला सांगत असते ती “काय” (what?) बनवते ते. ती जेव्हा तुम्हाला सांगते की आमची कार अत्यंत उत्कृष्ट अश्या कारखान्यात उत्तम दर्जाच्या मशीन्सवर बनते तेंव्हा ती तुम्हाला सांगत असते की ती कार “ कशी’ बनवतात ते. (How?). पण ती कम्पनी तुम्हाला जेव्हा सांगते की “ तुम्हाला सगळ्या जगाच्या पुढे रहायला आवडत असेल तर तुम्ही ही कार घ्या” तेंव्हा ती कार “ का” (why) घ्यायची हे ती तुम्हाला सांगत असते. आणि आपल्या मेंदू मधला जो निर्णय घेणारा भाग आहे, त्याला फक्त हा व्हाय कळतो. त्याला रॅशनॅलिटी, आकडेमोड, भाषा, हिशोब ...काही काही कळत नाही.
ईकारनामा काय करेल?
अनेकदा आपण पै पै करून वाहन खरेदी करतो. पण निवड चुकली की पश्चाताप करण्याची वेळ येते. घेतलेली गाडी परत विकायचे ठरवले तरी नुकसान अटळ आहे. त्यामुळे गाडी खरेदी करण्यापूर्वीच चोखंदळपणे ती खरेदी करण्यासाठी आपल्याला मदत करेल.
👉बाजारात आलेली नवीन वाहने यांची परिपूर्ण माहिती या संकेतस्थळावर आपल्या मराठी भाषेत आपण न्यूजच्या माध्यमातून देणार आहोत.
👉बाजारात नवीन आलेल्या वाहनांची स्वतः टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलेले अनुभव रिव्ह्यूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
👉या क्षेत्रातील तज्ञांची मते आपण व्ह्यूज माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
न्यूज, व्ह्यूज आणि रिव्ह्यूज या माध्यमातून ईकारनामा आपली निवड चोखंदळ करण्याचा प्रयत्न करेल.
ईकारनामा नाव का?
हा प्रश्न आपल्याला नक्की पडेल? सद्या प्रदूषण ही जगापुढील मोठी समस्या आहे. यात पारंपरिक इंजिनाच्या वाहनांपासून होणाऱ्या प्रदूषणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे जगाने पर्यावरण पूरक वाहनांची निर्मिती सुरू केली आहे. त्यात विद्युत वाहने आत्ता बाळसे धरत आहेत. हे सर्व नविन तंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहचवणे व शासनाच्या धोरणाला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करणे यासाठी ईकारनामा असे नाव दिले आहे.
ईकारनामा नक्की वाचत रहा... www.ecarnama.in या संकेस्थळावर नियमित भेट द्या आणि सबस्क्राईब करा.
(आम्ही असा दावा करणार नाही की, दिलेली माहिती वाचून आपण तेच वाहन खरेदी करावे. )
संपादक : अनिकेत बैलकर
मेकॅनिकल इंजिनिअर